तीन दिवसांसाठी भाड्याने नेलेली कार परत आणलीच नाही; भाडेकरू ग्राहकावर गुन्हा दाखल

0
252

वाकड,दि.२०(पीसीबी) – तीन दिवसांसाठी भाड्याने म्हणून नेलेली कार भाडेकरू ग्राहकाने परत आणून दिली नाही. याबाबत भाडेकरू ग्राहकावर विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाकड परिसरात 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला आहे. 

भारतभाई चंदूभाई रतवा (वय 31, रा. डोलकीया, ता. संनखेडा, जि. बडोदरा, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मनमोहन ओंकारसिंह अहलुवालिया (वय 59, रा. मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे) यांनी 19 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अहलुवालिया हे लोहगाव पुणे येथील प्राईम मुव्हर्स मोबेलीटी टेक्नोलॉजी या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. या कंपनीकडून ग्राहकांना भाड्याने कार दिल्या जातात. कंपनी भाडेकरूला हव्या असलेल्या ठिकाणी कार नेऊन देते आणि भाडे झाल्यानंतर कंपनीचे चालक जाऊन ग्राहक सांगेल त्या ठिकाणावरून कार घेऊन येतात.

18 ऑगस्ट 2020 रोजी आरोपी रतवा याने फिर्यादी यांच्या कंपनीची कार (एम एच 01 / सी व्ही 5868) ऑनलाईन माध्यमातून तीन दिवसांसाठी बुक केली. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी रतवा याने बुक केलेली कार कंपनीच्या चालकाने भूमकर चौक येथे नेऊन रतवा याच्या ताब्यात दिली.

दोन दिवसात तुमची कार परत देतो असे सांगून रतवा निघून गेला. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी यांनी आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. तसेच फिर्यादी यांच्या कंपनीच्या कारचे जीपीएस लोकेशन तपासले असता ते देखील बंद होते. रतवा याने फिर्यादी यांच्या कंपनीची 15 लाखांची कार घेऊन पळून जाऊन विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.