तीन आजी, पाच माजी नगरसेवक अनेक मान्यवरांवर कोरोनाची अवकृपा आणखी किती धक्के बसणार…

0
477

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोनामुळे गेल्या चार-सहा महिन्यांत उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मधील तीन विद्यमान आणि आठ माजी नगरसेवकांसह काही मान्यवरांचे निधन झाले. आजवर १२९० लोक कोरोना बाधित होऊन निवर्तले. काही कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखांसह घरातील दोन-तीन जण एकामागोमाग गेल्याने घरे उजाड झाली. रोजच्या निधनाच्या बातम्या आणि स्मशानातील ते भेसूर चित्र पाहून लोक खचले. कोरोनाची लस येत नाही तोवर हे संकट अधिकाधिक गहिरे होत जाणार असे म्हणतात. लॉकडाऊन खुला केल्यानंतरच कोरोनाचा प्रसार वाढला आहे. तूर्तास मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझेशन ही खबरदारी तसेच आजाराची लक्षणे आढळताच लवकर निदान, लवकर उपचार हाच एकमेव पर्याय आहे.

पिंपरी चिंचवड शहरात मार्च मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. महापालिका प्रशासन, नागरिक त्यानंतर सतर्क झाले. लॉकडाऊन कठोरपणे पाळला, पण काही बेशिस्त लोकांमुळे घात झाला. बहुसंख्य लोकप्रतिनिधी लोकांना मदतीसाठी अहोरात्र झटले आणि त्यात अनवधानाने कोरोनाने त्यांनाच गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली परिसरातील धडाडीचे नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना कोरोनाची बाधा झाली आणि उपचार सुरू असताना अवघ्या आठवड्याभरात त्यांचे निधन झाले. शहरासाठी हा पहिलाच मोठा धक्का होता. पाठोपाठ राष्ट्रवादीचे आकुर्डी-मोहननगर मधून जिंकलेले दुसरे जेष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या जाण्याची वार्ता आली. गेल्या आठवडयात दिघी मधील लक्ष्मण उंडे या भाजप नगरसेवकाचे निधन झाले. दोन महिन्यांत तीन विद्यमान नगरसेवक गेले.

माजी महापौर रंगनाथ फुगे यांच्यास हनुमंत खोमने, लक्ष्मण गायकवाड, एकनाथ थोरात, शकुंतला साठे, साहेबराव खरात, सुलोचना बढे असे एक एक माजी नगरसेवकांचे निधन हा सुध्दा सार्वजनिक क्षेत्रासाठी धक्का होता. भाजपचे जेष्ठ नेते वसंत वाणी, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड, शहरातील पर्यावरण चळवळीला दिशा देणारे हाडाचे कार्यकर्ते व पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांचे निधन सर्वांसाठीच एक शॉकिंग न्यूज होती. खराळवाडी मधील कलापुरे कुटुंबातील एकाच घरातील सख्खे तीन भाऊ नऊ दिवसांत स्वर्गवासी झाले. शहरात अशा प्रकारे अनेक कुटुंबात कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक असे निधन पावले. कोरोनामुळे काही घरे अक्षरशः उध्वस्थ झाली, अनाथ झाली आहेत. अशा प्रकारचे आणखी किती धक्के बसणार ते समजण्यापलिकडे आहे.

कोरोना प्रसार आटोक्यात –
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती आता काहीशी आटोक्यात आली आहे. आज अखेर शहरात करारात्मक रुग्णांची संख्या ७६ हजार ६३३ आहे, तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या जवळपास तितकीच म्हणजे ६८ हजार २५५ आहे. शहरातील एकूण मृतांची संख्या १२९० तर शहराबाहेरील ४७९ आहे. रोजच्या अहवालात कोरोना बाधितांची संख्या जी सुमारे ११०० च्या सरासरीत होती ती आता मंगळवारी ५५४ पर्यंत खाली आली. घरोघरी तपासणी सुरू असून सुमारे १० लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे

वीस नगरसेवकांची कोरोनावर यशस्वी मात –
आमदार महेश लांडगे यांच्यासह २० नगरसेवकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात प्रामुख्याने सिमाताई सावळे, आशा शेंडगे, राहुल कलाटे, भिमाबाई फुगे, स्विनल म्हेत्रे, तुषार कामठे, निर्मला कुटे, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, सुजाता पालांडे, चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, कमल घोलप, साधना मळेकर, विलास मडिगेरी, डब्बू आसवाणी, नाना काटे यांचा समावेश आहे.