तिहार जेलमधील काश्मिरी कैद्यांची सुरक्षा वाढवली

0
618

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर तिहार जेलमधील कैद्यांची सुरक्षा वाढवली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर तिहार जेलमध्ये कैद्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कैद्यांनी दोन मिनिटांचे मौन ठेवले. यावेळी जेल प्रशासनाने सुरक्षेचा आढावा घेतला. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याने देशभर संतापाची लाट आहे. तिहार जेलमध्ये बरेच काश्मीरमधील कैदी बंदीस्त आहेत. या कैद्यांवर जीवघेणा हल्ला होवू शकतो, अशी भीती जेल प्रशासनाला वाटत आहे. रागाच्या भरात देशातील कैदी काश्मीरच्या कैद्यावर हल्ला करू शकतात, अशी भीती वाटल्याने प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे. काश्मीरच्या कैद्यांना इतर कैद्यापासून वेगळे ठेवले जातेय, असे असले तरी या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे, असे जेल प्रशासनाने सांगितले आहे.

कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली आहे. तिहार जेलमध्ये दहशतवादी कैदी असो किंवा छोटी-मोठी चोरी करणार कैदी असो या सर्वांची सुरक्षा करणे हे जेल प्रशासनाचे काम आहे. कैद्यांना शिक्षा देण्याचे काम कोर्टाचे आहे. जोपर्यंत हे सर्व लोक जेलमध्ये बंदीस्त आहेत. त्या सर्वांची सुरक्षा करणे हे आमचे काम आहे, यासाठीच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली आहे.