तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग

0
1135

पुणे, दि. १० (पीसीबी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करुन स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याचे संकेत दिले आहेत. असं असलं तरी तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर पुण्यात गेल्या वर्षभरात सव्वा दोन लाख बालकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय.

दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे. या निर्देशानंतर अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे.

देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल –
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका अलर्ट मोडवर आहे. पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारले जाईल. या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे. या हॉस्पिटलसाठी चार कोटी रुपयांचा खर्च येणार असून येत्या दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.

औरंगाबादेत लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालय
पुण्याप्रमाणेच औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. औरंगाबादेतील एमजीएम परिसरात 100 खाटांचे कोविड बाल रुग्णालय उभं राहणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही तयारी केली जात आहे. लहान मुलांसोबतच गरोदर मातांसाठीही 50 खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसात हे रुग्णालय उभे केले जाईल, असे बोलले जात आहे.

नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव म्हणतात, “कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे.” गेल्या वर्षी, जेथे बहुतेक मुले एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताप, सर्दी आणि खोकला, कोरडा खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, जेवण नीट न जेवणे, थकवा जाणवणे, शरीरावर पुरळ उठणे, श्वास घेताना अडचण जाणवणे आदी लक्षणे दसू लागली तर तात्काळ तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे,