Others

तिरुपती बालाजी आणि विविध देवसंस्थांनांना दान केलेल्या ‘त्या’ केसांचं पुढे काय करतात?

By PCB Author

March 02, 2021

आपल्या डोक्यावर नको असलेले केस बऱ्याचदा आपण विशिष्ट प्रकारे कापतो, की जेणेकरून आपलं सौंदर्य आणखीन खुलून दिसावं. पण बऱ्याचदा आपण कापलेले केस हे कचऱ्यात जातात असं आपल्याला वाटतं. पण आपल्याला माहित असेल तर डोक्यावरील केस अनेक देवस्थानांमध्ये पैसे, मौल्यवान वस्तू, दागिन्यांप्रमाणेच दान करण्याचीही प्रथा आहे. आंध्रप्रदेशमधील तिरुपती या जगप्रसिद्ध देवस्थानात अनेक वर्षांपासून ‘केशदाना’ची प्रथा प्रसिद्ध आहे. इथं पुरुष आणि महिलासुद्धा आपले सगळे केस अर्पण करतात. आपणास हे माहित नसेल पण काही पार्लरमध्ये देखील आपण केस दान करू शकतो. कारण, अशा सलून, पार्लरमध्ये कापलेले किंवा दान केलेले किंवा देवस्थानात अर्पण केलेले केस हा एक मोठा व्यापार असतो, हि गोष्ट काही लोकांनाच माहिती आहे.

पण हा केसांचा व्यापार नक्की काय आणि कसा केला जातो? तर देवसंस्थानाच्या ठिकाणी या कापलेल्या आणि दान केलेल्या केसांचा उपयोग हा प्रामुख्याने कॅन्सर पेशंटसाठी केला जातो. कारण, कॅन्सरमध्ये रुग्णांवरती केमोथेरपी, रेडिएशन या तंत्राद्वारे उपचार केले जातात. परंतु, या उपचारांचे साईड इफेक्ट म्हणजे या रुग्णांचे केस गळून जातात. अशा सर्व रुग्णांना या केसांपासून तयार केलेल्या विगचा (गंगावन) उपयोग होतो. कारण, केस नसलेल्या महिला रुग्णांना समाजात वावरणं नकोस वाटतं. म्हणून त्या रुग्णांना अशा केसांचा उपयोग होतो. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर या कापलेल्या केसांचा खूप मोठा व्यापार चालतो. सध्या पाहिलं तर जगात भारत आणि चीन हे असे मोठे देश आहेत जिथून मोठ्या प्रमाणावर केसांचा व्यापार होतो. जगभरातल्या कॅन्सर पेशंटना यापासून दिलासा मिळाला आहे. कारण, या केसांवरती प्रक्रिया करून हे केस जगभरात पुरवले जातात. एवढेच नाहीतर, याशिवाय नाटक, फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील प्रत्येक व्यक्तिरेखेनुसार केसांचे विग पुरवले जातात. लांब केस दाखवण्यासाठी केसांचे एक्सटेन्शन लावावे लागतात. यासाठी या केसांचा उपयोग होतो.

फ्रान्स मधल्या एका मासिकात असं म्हंटल गेलय कि, १८४० मध्ये तिथे बाजारामध्ये मुली आपले केस विकायच्या. १८७३ च्या मासिकांमध्ये त्यावेळेचे उल्लेख आहेत, ज्यामध्ये त्या मुलींचे केस, त्याची क्वालिटी आणि लांबी हे पाहून बोली ठरवली जायची आणि त्या केसांचा लिलाव केला जायचा. म्हणजे अगदी तेव्हापासूनच विग वापरात होते, असं म्हणायला काहीही हरकत नाही. पुढेपुढे या केसांच्या विगची मागणी वाढली. मग स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, रशिया इत्यादी देशांमध्ये केसांचा व्यापार सुरू झाला. मात्र पुढे १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि हा केसांचा व्यापार काही काळ मंदावला पण जसं युद्ध थांबलं तसं परत केसांचा व्यापार पुन्हा सुरू झाला. मात्र काही कारणांमुळे हा व्यवसाय परदेशात तर थांबला. परंतु त्यामुळे केसांची मागणी वाढली असताना भारतात केसांचा व्यापार करण्यावर जोर दिला गेला. मग आता भारतामध्ये घरोघरी जाऊन केस जमा केले जातात, मंदिरांमध्ये दान दिलेले केस घेतले जातात, पार्लर मधले केस जमा करून त्यांच्यावर प्रक्रिया करून हे केस विकले जातात. चेन्नईमध्ये ह्यूमन हेअर फॅक्टरी चालवणाऱ्या के एल किशोर म्हणतात, की त्यांचा “हा बिझनेस त्यांच्या पणजोबांच्या काळापासूनच आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज असताना त्यांच्या न्यायालयातील “जज” साठी पांढऱ्या केसांच्या विग हवा होता, तो किशोर यांच्या पणजोबांनी बनवून दिला. आणि तेव्हापासूनच त्यांचा हा बिजनेस सुरु झाला.” तस पाहिलं तर भारतात या केसांवरती प्रक्रिया करणारे बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी कारखाने आहेत. हे केस गोळा करणारे लोक बेंगलोरमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. जो कचरा ते लोक वेचतात, त्यातून केस वेगळे काढतात.

तस पाहिलं तर स्त्रियांच्या लांब केसांना चांगली किंमत मिळते. कमी लांबीच्या आणि पांढऱ्या केसांना तितकी किंमत मिळत नाही. ते लोक हे केस घरी आणून ते त्या केसांच्या लांबी आणि रंगाप्रमाणे वेगळे करून ते दोन-तीन वेळेस स्वच्छ धुऊन वाळवतात. कारण अशा एक किलो केसांना बेंगलोर मध्ये अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. पण हेच केस परदेशामध्ये ३०००० रुपये किलोने विकले जातात. दररोज पाचशे किलो केस तिरुपती देवस्थानात दान म्हणून मिळतात. मात्र या केसांचा लीलाव हा ऑनलाइन केला जातो. आणि हे केस २५ ते ३० हजार रुपये किलोने विकले जातात. जी कंपनी हे केस विकत घेते, ती केसांना स्वच्छ धुते, वाळवते आणि त्याच्या लांबीप्रमाणे वर्गीकरण करते. त्यांचे गठ्ठे तयार करून मगच ते परदेशात विकते. परदेशात या केसांचे विग बनवून केसांच्या क्वालिटी प्रमाणे त्या विगची किंमत ठरवली जाते. चित्रपट सृष्टीतले कलाकार केसांवर अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांचं बघून त्यांचे चाहते तसा राहण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच हेअर इंडस्ट्रीला सध्या खूपच चांगले दिवस आलेले आहेत.

तस पाहिलं तर संपूर्ण जगभरात २२५०० करोड रुपयांपर्यंत केसांचा कारभार पोहोचलेला आहे. आणि आता तो २०२३ पर्यंत ७५००० कोटी रुपयांपर्यंत जाईल. असा अंदाज आहे. भारताने २०१८ मध्ये २५० कोटी रुपयांचा केसांचा व्यापार केला असून छोटे आणि रफ केस यांचा वापर सॉफ्ट टॉईज, उशा, कपडे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे आता आपल्या लक्षात आले असेलच कि आपण दररोज केस विंचरून कचऱ्यात फेकतो खरे पण आपल्याला हि कल्पना सुद्धा नसते कि, या केसांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. जो जगभर पसरला आहे. जे लोक विग वापरतात त्यांना कल्पना देखील नसते कि, आपल्या विग चे केस कुठल्या देशातून आलेले आहे.