Desh

तिन्ही वर्ल्डकप जिंकणारा इंग्लंड ठरला पहिला देश

By PCB Author

July 15, 2019

मुंबई, दि, १५ (पीसीबी) –  इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेला २०१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल. सामना टाय होईल आणि निकाल सुपरओव्हरमध्ये लागेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सुपरओव्हरमध्ये देखील सामना टाय झाला पण सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने विजय मिळवत पहिल्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली.

या विजयासह इंग्लंड क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बीचे विजेतेपद मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. क्रीडा क्षेत्रात महत्वाच्या स्पर्धांमध्ये इंग्लंडला पहिले यश १९६६ साली मिळाले. त्यावेळी इंग्लंडने पश्चिम जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदा फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकला होता.

२००३ साली इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा २०-१७ असा पराभव करुन पहिल्यांदा रग्बी वर्ल्डकप जिंकला. १९६६ सालच्या फुटबॉल वर्ल्डकपनंतर इंग्लंडने जिंकलेले ते दुसरे विश्वविजेतेपद होते. क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने २४ तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या बळावर इंग्लंडने पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले.