तिन्ही राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा काँग्रेसमध्ये तिढा कायम    

0
737

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – तीन राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.  याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम कायम असून दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत.  राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये मुख्यमंत्री देण्यावरुन वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या नावावर  शिक्कामोर्तब करण्यात विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशमधून कमलनाथ यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जवळ जवळ निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.  मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ गट आणि ज्योतिरादित्य शिंदे गट निर्माण झाले आहेत. उत्तरेत भोलेनाथ आणि मध्यप्रदेशात कमलनाथ अशा घोषणा दिल्या जात आहेत, तर ज्योतिरादित्य शिंदे समर्थकही ज्योतिरादित्य मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आक्रमक झाले आहेत.

तर राजस्थानमध्येही मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र सचिन पायलट यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी करत त्यांचे शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर आता टीएस सिंहदेव यांच्या समर्थकांनीही मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.