तालुक्याच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांना एकजूटीने काम करावे आमदार सुनिल शेळके यांचे आवाहन

0
847

मावळ, दि.२५ (पीसीबी) – औद्योगिक क्षेत्राची सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेले योगदान मावळ तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी मावळच्या जनतेच्या सर्वसमावेशक विकासासाठी सहभागी होऊन नाविन्यपूर्ण, प्रभावीपणे काम करावे असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.

मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधीसोबत सुसंवाद साधण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  दळणवळण, वीज अनियमितता, पाणीटंचाई हे प्रमुख प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहेत. तळेगाव MIDC मध्ये ट्रक टर्मिनल, औद्योगिक क्षेत्रासाठी अद्ययावत फायर ब्रिगेड होणे गरजेचे आहे. अशा  अनेक समस्या औद्योगिक क्षेत्रात आहेत. प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना त्यांना येणार्या समस्या मांडल्या.

शेळके यांनी सांगितले, तुम्ही जसे एखाद्या कंपनीचे कर्मचारी आहात तसा मी पण या जनतेचा कर्मचारी आहे. स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, कौशल्य विकासातुन महिलांचे स्वावलंबीकरण झाले पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या  संधी मर्यादित आहे, जिथे मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी आपण सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्यांची गुंतवणूक कशी वाढेल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल. तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही भरीव योगदान देणे गरजेचे आहे, CSR निधी अंतर्गत सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. मुलभुत सुविधांसाठी याचा जास्तीत जास्त वापर व्हावा. CSR च्या माध्यमातून शक्य ती मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. तालुक्याच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांना एकजूटीने काम करावे लागणार आहे. असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.