तालिबान्यांचा ‘आयएसआय’वर हल्लाबोल

0
446

काबूल, दि. ४ (पीसीबी) – काबूलमध्ये रविवारी ईदगाह मशिदीबाहेर झालेल्या स्फोटानंतर तालिबानने संताप व्यक्त केला आहे. या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तालिबानने आयएसआयएस खुरासानच्या तळांवर हल्ला केलाय. तालिबानने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार संघटनेच्या तरुणांनी मशिदीबाहेर स्फोट झाल्यानंतर काही तासांमध्येच काबूलमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हल्ले करुन अनेक दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केलाय. एएफपीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

काबूलमध्ये रविवारी ईदगाह मशिदीबाहेर तालिबानी नेते आणि प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांच्या आईच्या निधनानंतर एक प्रार्थनासभा आयोजित करण्यात आलेली. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या स्फोटात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नसली तरी तालिबानला या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटच्या खुरासान गटाचा हात असल्याची शंका आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर एका महिन्यामध्येच आयएसआयएस-के या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खुरासान गटाने तालिबान्यांवर हल्ले सुरु केल्याचं पहायला मिळत आहे.

प्रवक्ता मुजाहिदने दिलेल्या माहितीनुसार तालिबानसाठी लढणाऱ्या तरुणांनी काबूलच्या उत्तरेला अशणाऱ्या कैर खानामधील इस्लामिक स्टेटच्या एका तळावर ह्लला केला. मात्र आयएसचे किती दहशतवादी ठार झाले याची सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच या हल्लामध्ये तालिबानकडून लढणाऱ्यांपैकी कोणी जखमी झालं आहे किंवा ठार झालं आहे का याबद्दलही माहिती देण्यात आलेली नाही.

अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर रविवारी झालेला स्फोट हा देशातील सर्वात मोठा स्फोट होता. यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयचएसआयएस-के या संघटनेनं घेतली होती. या हल्ल्यामध्ये १६९ जण जखमी झाले होते तर १३ अमेरिकन सैनिक मृत्यूमुखी पडले होते. इस्लामिक स्टेटच्या खुरासान गटाचे वर्चस्व अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहारमध्ये आहे. खुरासान हे तालिबान्यांना आपला शत्रू मानतात. मागील काही काळामध्ये तालिबानवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.