तालिबानला टाळत अफगाणिस्तानच्या महिला फुटबॉलपटू पाकिस्तानात

0
212

इस्लामाबाद, दि. १५ (पीसीबी) : महिलांवर खेळण्याचे निर्बंध टाकणाऱ्या तालिबानला टाळून अफगाणिस्तानच्या ३२ फुटबॉलपटू आपल्या कुटुंबिंयासह पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत.

तालिबान सरकारने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथे महिलांवर निर्बंध लादण्यास सुरवात केली होती. महिलांच्या खेळण्यावरही त्यांनी बंधने आणली होती. खेळणे म्हणजे निव्वळ देहप्रदर्शन अशी भूमिका तालिबानने घेतली होती. महिलांना धमकावलेही जात होके. त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन मानवतावादी व्हिसा देखिल काढण्यात आला. त्यानंतर या महिला खेळाडूंनी हे पाऊल उचलले.

या फुटबॉलपटूंमध्ये जास्त करून अफगाणिस्तानच्या ज्युनियर खेळाडूंचा समावेश आहे. या मुली खरे तर कतारला जाणार होत्या. येथे फिफाने २०२२ विश्वकरंडकासाठी अफगाणिस्तानमधील निर्वासितांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, काबुल विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर त्यांना आपला कार्यक्रम बदलावा लागला.

खेळामध्ये सहभाग असल्यामुळे तालिबानकडून या मुलींना धमक्या येत असल्याचे वृत्त डॉन या दैनिकाने दिले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून या मुली तालिबानपासून बचाव करण्यासाठी लपून बसल्या होत्या. या ३२ फुटबॉलपटूंना पाकिस्तानात आणण्यासाठी ब्रिटनस्थित स्वयंसेवी संस्था पाकिस्तान फुटबॉल महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करत होत्या. त्याला फिफाने मान्यता दिली नाही. फिफाचे अध्यक्ष गिआनी इन्फॅन्टिनो यांनी गेल्याच आठवड्यात दोहाच्या दौऱ्या दरम्यान अफगाण निर्वासितांना भेट दिली होती. परंतु, अफगाणास्तानातील महिला फुटबॉलपटूंना मदत करण्यात त्यांनी निष्क्रियता दाखवली. त्यामुळे त्यांना टिका सहन करावी लागत आहे. आता या सर्वांना पेशावरहून पाकिस्तान फुटबॉल महासंघाचे कार्यालय असलेल्या लाहोरला नेण्यात येईल. तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात येईल.