Desh

तालिबाननंतर सीपीआय-माओवादी सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना- अमेरिका

By PCB Author

September 22, 2018

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – इस्लामिक स्टेट (आयएस), तालिबान आणि अल-शबाब या दहशतवादी संघटनांनंतर सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अहवाल जाहीर करून ही माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादाने पोळलेले देश आणि जगातील धोकादायक दहशतवादी संघटना यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दहशतवादाने पोळलेल्या पोळलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर इराक आणि त्यानंतर अफगाणिस्तानचा नंबर आहे. या अहवालात दहशतवादाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी देण्यात आल्या आहेत. सीपीआय-माओवादी जगातील चौथी धोकादायक दहशतवादी संघटना असल्याचे अमेरिकेच्या या अहवालात म्हटले आहे.

भारततील ५३ टक्के हल्ल्यात सीपीआय-माओवाद्यांचा हात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, २०१६ आणि २०१७ मध्ये भारतातील माओवाद्यांचे हल्ले कमी झाल्याचेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तर माओवाद्यांच्या हल्ल्यात मरणाऱ्यांच्या संख्येत १६ टक्क्यांनी आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगभरात माओवाद्यांनी २९५, अल-शबाबने ३५३, तालिबानने ७०३ आणि आयएसने ८५७ हल्ले केल्याचेही या अहवालात म्हटले आहे.