तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी करूणानिधीपेक्षा मोठे समजतात काय? – रजनीकांत  

0
1085

चेन्नई, दि. १४ (पीसीबी) –  तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांच्या अंत्यसंस्काराला तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आले नव्हते, त्यावरून अभिनेते रजनीकांत यांनी पलानीस्वामी यांना झापले. करूणानिधी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मग पलानीस्वामी का आले नाहीत, ते स्वत:ला करूणानिधी यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? असाही सवाल रजनीकांत यांनी केला आहे.

एमजीआर आणि जयललिता हे दोघेही करूणानिधींचे विरोधक होते. गेल्या आठवड्यात एम. करूणानिधी यांचे निधन झाले. त्यानंतर तामिळनाडूच्या चित्रपटसृष्टीतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रजनीकांत यांनी पलानीस्वामींवर टीका केली. करूणानिधी सत्तेत नव्हते मात्र देशभरातले नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. करूणानिधी हे माझे जुने स्नेही होते असाही उल्लेख रजनीकांत यांनी केला.

एवढेच नाही तर तामिळनाडूची जनता मोठ्या प्रमाणावर करूणानिधींना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होती असेही त्यांनी स्पष्ट केले. इतक्या मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती की अनेक दिग्गज नेत्यांना जनसागरातून वाट काढत जावे लागले असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे. करूणानिधी हे एक महान नेते होते. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबतही राहतील असा विश्वास रजनीकांत यांनी व्यक्त केला.