तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर मरिना बीचवर अंत्यसंस्कार

0
761

चेन्नई, दि. ८ (पीसीबी) – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते तसेच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांच्यावर आज (बुधवार) सायंकाळी मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. याआधी अभिनेता रजनीकांत, कमला हासन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतले होते.

करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता. समर्थक नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. दरम्यान चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.