Chinchwad

ताथवडे महावितरण कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी  

By PCB Author

December 06, 2018

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – ताथवडे येथील महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तरी  येथे अभियंते आणि   कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी मानवाधिकार संघटनेने महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ताथवडे येथील  कार्यालयात सध्या २७ कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर  कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. या कार्यालयाच्या हद्दीत थेरगांव, वाकड, ताथवडे, पुनावळे,  या गावांचा समावेश करण्यात आला आहे. थेरगाव, वाकड या गावांचा  मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे येथे कामाचा ताण वाढला आहे. यामुळे या कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, भरत वाल्हेकर,  सुभाष कोठारी, विजय मैड, अविनाश रानवडे, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, विकास कांबळे, ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, नितिन चौधरी, सतिश नगरकर आदी उपस्थित होते.