ताथवडेत पतीची गळफास घेऊन आत्महत्या; न्यायालयाच्या आदेशानंतर पत्नी आणि सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

0
530

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – जमीन नावावर करुन घेण्यासाठी पत्नीने काहीएक न ऐकता वेगवेगळ्या मार्गाने पतीला त्रास दिला. तसेच दोघा मेहुण्यांनी पैसे घेऊन कर्ज बाजारी केले. यामुळे कंटाळेल्या पतीने राहत्या घरात गळाफास घेत आत्महत्या केली. ही घटना जुन २०१६ मध्ये ओमशिव कॉलनी, ताथवडे येथे घडली होती. शिवाजीनगर न्यायालयाने आदेश देताच बुधवारी (दि.१० जुलै) वाकड पोलिस ठाण्यात मृत तरुणाची पत्नी, सासू, आणि दोघा मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

सुनील महादेव नवले (वय २५, रा. ओमशिव कॉलनी, ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुनीलची आई सुमन महादेव नवले (वय ५५, रा. ओमशिव कॉलनी, ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार, पत्नी शिवांजली सुनिल नवले (वय २३), सासू महादेवी रामदास चौरे (वय ४५), मेहुणे सत्यवान रामदास चौरे (वय २४) आणि शिवरत्न रामदास चौरे (वय २३, सर्व रा. शांतीनगर हौसिंग सोसायटी, हडपसर, पुणे) या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन २०१६ मध्ये ताथवडे येथील राहत्या घरात सुनील याने गळाफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची आई सुमन यांनी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, न्यायालयाने आदेश देताच बुधवारी (दि.१० जुलै) वाकड पोलिस ठाण्यात पत्नी, सासू आणि दोघा मेहुण्यांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुमन यांनी त्यांच्या तक्रारीत जमीन नावावर करुन घेण्यासाठी सुन शिवांजली आणि सासू महादेवी हिने वेगवेगळ्या मार्गाने सुनील याला त्रास दिला. तसेच दोघा मेहुण्यांनी पैसे घेऊन कर्ज बाजारी केले. यामुळेच सुनीलने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.