ताडोबा मध्ये १ जुलै पासून व्याघ्र सफारी

0
466

ताडोबा, दि. २४ (पीसीबी) – कोरोना टाळेबंदीत सलग तीन महिन्यापासून बंद असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये १ जुलै पासून पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बफर झोनच्या सर्व १३ प्रवेशद्वारातून पर्यटन सुरू होणार असून कोअर झोनमध्ये पर्यटन होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी सोमवारी ताडोबातील रिसोर्ट मालक, जिप्सी चालक, गाईड, होम स्टे तथा इतरांची बैठक घेतली. या बैठकीत १ जुलै पासून पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या टाळेबंदीत ताडोबा प्रकल्प ऑनलाईन पध्दतीने पर्यटकांना व्याघ्र दर्शन करून देत होता. मात्र आता पर्यटकांना बफर झोनमधील १३ प्रवेशद्वारातून थेट प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये देवडा, अगरझरी, जुनोना, ममला, पांगडी, झरी, डोणी, कोलारा, सिरकडा, मदनापूर,अलिझंझा, नावेगाव आणि रामदेगी या १३ प्रवेशव्दाराचा समावेश आहे. सिमेंट रस्त्याने ३० ते ४० किलोमीटर पर्यंत पर्यटन खुले राहणार आहे. यासाठी ऑनलाईन नाही तर थेट प्रवेशव्दारावर बुकींक होणार आहे. त्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या असून ताडोबा बफर झोनसाठी १ हजार रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तर प्रत्येक गेटमधून जिप्सी शुल्क २२०० रुपये आणि गाईड शुलक ३५० रूपये असणार आहे.

प्रत्येक गेटमधून सकाळ व दुपारी प्रत्येकी सहा अशा किमान १२ वाहनांना परवानगी दिली जाईल. कोरोना बघता एका जिप्सीत अंतर ठेवून चार पर्यटकांना प्रवेश राहणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणारे पर्यटन सुरू करण्यास काही हरकत नाही असे सांगताच प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव)नितीन काकोडकर यांनी व्याघ्र प्रकल्पांना तशा सूचना दिला. ताडोबा व्यवस्थापनाला सूचना मिळाल्यानंतरच पर्यटन सुरू करण्याची तयारी करण्यात आली. दरम्यान पर्यटन सुरू होणार असल्याचा सर्वाधिक आनंद प्रकल्पातील जिप्सी चालक, गाईड, हॉटेल व्यवसायी व पर्यटन व्यवसायिकांना झाला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांचेशी संपर्क साधला असता, १ जुलै पासून पर्यटन सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.