Pune Gramin

तळेगाव येथे २४ लाखाची दारू जप्त; तीघांना अटक

By PCB Author

July 06, 2018

तळेगांव, दि. ६ (पीसीबी) – अवैधरित्या भारतीय बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमधून २३ लाख ३७ हजार ८४० रुपयांचे सुमारे मद्याचे ३० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ४) निघोजे एमआयडीसी हद्दीतील तळवडे म्हाळुंगे रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी तीघाना अटक करण्यात आली आहे.

भुवन गोविंदवल्लभ बलसुनी (वय ३७, रा. ताम्हाने वस्ती, चिखली), महादेव हरिदास गायकवाड (वय ३३, रा. वारजे माळवाडी), चेतन चंद्रकांत गायकवाड (वय २३, रा. २५८ गायकवाड वाडी, बहुली गावठाण, बहुली, ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे – म्हाळुंगे रस्त्यावर अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगाव दाभाडे कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार, तळवडे म्हाळुंगे रस्त्यावर सापळा रचून इनोव्हा (एमएच १२ केएन ४०००) आणि बोलेरो पिकअप (एमएच १२ एनएक्स १८२७)  या दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनांमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे प्रत्येकी १८० मि. ली. ४८ बाटल्या असलेले एकूण ३० बॉक्स मिळाले.

या प्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली असून मिळालेला मद्यसाठा जप्त केला आहे. पोलिस तपास करत आहेत.