Pune Gramin

तळेगाव दाभाडेत कामगार नेते शरद राव यांचा अर्धाकृती पुतळा; शरद पवारांच्या हस्ते अनावरण होणार

By PCB Author

August 30, 2018

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या प्रांगणात कामगारांचे दिवंगत नेते शरद राव यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अनावरण केले जाणार आहे.

शरद राव हे कामगार नेते होते. ते ४५ वर्षांहून अधिक काळ कामगारांच्यासाठी काम करत होते. कामगारांच्या हक्कासाठी सतत लढणारा एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे १ सप्टेंबर २०१६ रोजी निधन झाले. राज्यभरातील महापालिकांमधील कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कारखाने, उद्योग व व्यवसायातील कामगार आणि कर्मचारी, कापड बाजारातील गुमास्ता, कंत्राटी कामगार, फेरीवाले, टॅक्सी-ऑटोरिक्षा चालक-मालक, रोजंदारीवर काम करणारे कामगार, किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार, श्रमजीवी-कष्टकरी, गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरीकांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी शरद राव अहोरात्र झटले.

अशा या कामगार नेत्याचे चिरंतर स्मारक होण्यासाठी म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते अॅड. सुखदेव काशिद व नवनाथ घाडगे यांनी पुढाकार घेतला. या दोघांच्या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे, कडोलकर कॉलनी येथील डॉ. राममनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या प्रांगणात कामगार नेते शरद राव यांचा अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. पंचधातूच्या या अर्धपुतळ्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अनावरण केले जाणार आहे. महापालिका कामगार नेते अॅड. महाबळ शेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, म्युनिसीपल मजदूर युनियन मुंबईचे सेक्रेटरी गोविंद कामतेकर आदी उपस्थित असतील.