Pune Gramin

तळेगाव चौकात चाकण पोलसांनी लावला ‘असा’ सापळा आणि पकडले चक्क ‘इतक्या’ किमतीचे गोमांस

By PCB Author

January 19, 2021

चाकण, दि. 19 (पीसीबी): विनापरवाना गोमांस कापून त्याची विक्री करण्यासाठी घेऊन जाताना एक टेम्पो चाकण पोलिसांनी पकडला असून त्यात तब्बल 3 लाख 60 हजारांचे गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत एकाला अटक करून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असलम फकीर मोहम्मद शेख (वय 38, रा. खरशिंदे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), अब्दुल हक (पूर्ण नाव माहिती नाही. रा. अहमदनगर), गोमांस विकास घेणारा असिफ भाई, नाना (पूर्ण नाव माहिती नाही. रा. मुंबई), पीकअप मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शिक्रापूर-चाकण रोडने एक टेम्पो (एम एच 14 / एच जी 6694) गोमांस घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी चाकण मधील तळेगाव चौकात सापळा लावून टेम्पो अडवला. टेम्पोमध्ये दोन हजार किलो वजनाचे कापलेले गोवंशाचे मांस आढळून आले. टेम्पो चालकाकडे याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 30 हजारांचा पिकअप टेम्पो आणि 3 लाख 60 हजारांचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.