Pimpri

तळेगाव एमआयडीसी येथे लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ‘सामाजिक सुरक्षा पथका’चा छापा; दोन तरुणींची सुटका

By PCB Author

October 30, 2020

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने तळेगाव एमआयडीसी येथे एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला. त्यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 28) करण्यात आली.

जॉन प्रकाश राव ऊर्फ आण्णा, एजंट नामे सागर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुध्द तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1976 चे कलम 3, 4, 7 तसेच भारतीय दंड विधान कलम 370 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रसाद गोकूळे यांना बुधवारी (दि. 28) माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जॉन प्रकाश राव हा त्याच्या लॉजवर महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत आहे. यावरून पोलीस पथकाने एका बोगस कस्टमरला लॉजमध्ये पाठवले. बोगस कस्टमरने रूम बुक केली असता एक मुलगी ही बोगस कस्टमरच्या रूममध्ये आली. त्यावेळी सामाजिक सुरक्षा पथकाने लॉजवर छापा टाकला. यात 24 आणि 21 वर्षीय अशा दोन तरुणींची सुटका करण्यात आली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, विशेष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ अशोक डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय कांबळे, कर्मचारी सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांनी केली आहे.