Pune Gramin

तळेगावात वृध्द दुचाकीस्वाराला बसने चिरडले

By PCB Author

January 16, 2019

तळेगाव, दि. १६ (पीसीबी) – भरधाव बसच्या चाकाखाली सापडल्याने एका दुचाकीस्वार वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल दरम्यान घडली.

रत्नाकर शंकरराव शेडगे (वय ६०, रा. जीजामाता चौक, तळेगाव दाभाडे) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, मिनीबस चालक सुमित जैसवाल (वय ३०, तळेगाव दाभाडे, मावळ) याला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी दोनच्या सुमारास शेडगे हे त्यांच्या दुचाकीवरुन मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल समोरील रस्त्यावरुन जात होते. यावेळी त्यांची दुचाकीस्लीप झाली आणि दुचाकीसह ते मिनी बस क्रमांक (एमएच १२ एचबी-९५५९) खाली सापडले. त्यांच्या डोक्यावरुन बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालक जैसवाल याला अटक केली आहे. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.