Pune Gramin

तळेगावात पती-पत्नीला मारहाण; पतीने केली आत्महत्या

By PCB Author

April 26, 2019

तळेगाव, दि. २६ (पीसीबी) – चौघाजणांनी मिळून वारंवार पती-पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण केली. या त्रासाला कंटाळून पतीने राहत्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२३) सायंकाळी आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

अरुण जनार्धन आगळे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या २५ वर्षीय पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, स्वाती सुभाष आगळे, सुभाष रामभाऊ आगळे, निलीमा श्रीकांत आघळे आणि श्रीकांत दत्तात्रय आगळे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अरुण यांच्या २५ वर्षीय पत्नीला चौघे आरोपी वारंवार शिवीगाळ करुन दमदाटी करायचे. तसेच आरोपी स्वाती, निलीमा यांच्या सांगण्यावरुन श्रीकांत याने अरुण याला मारहाण केली होती. यामुळे कंटाळलेल्या अरुणने राहत्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्वरीत पिंपरीतील व्हायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२३) सायंकाळी आठच्या सुमारास त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि.२५) अरुणच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.