तळेगावात दाम्पत्यासोबत तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्याने एकावर धारदार शस्त्राने जीवघेणे वार

0
1277

तळेगाव, दि. १४ (पीसीबी) – सहा ते सातजणांच्या टोळक्यांनी एका दाम्पत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाम्पत्यासोबत एक इसमही गेला. यामुळे सहा ते सातजणांच्या टोळक्यांनी त्या इसमावर धारदार शस्त्रांनी जीवघेणे वार केले. ही घटना गुरुवार (दि.१३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील साई रेसीडेन्सी मावळ लॅण्ड येथे घडली.

विलास मारुती म्हसे असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुप्रसाद वारींगे, प्रविण भामरे आणि त्याचा भाऊ, निखील माने आणि इतर तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी फिर्यादी ३७ वर्षीय महिला आणि त्याचे पती मदन झगडे यांना आरोपी गुरुप्रसाद वारींगे, प्रविण भामरे आणि त्याचा भाऊ, निखील माने आणि इतर तिघाजणांनी मिळूण शिवीगाळ करत धक्काबुक्की केली होती. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी महिला आणि त्यांच्या पतीसोबत जखमी विलास म्हसे देखील गेले होते. विलास म्हसे देखील त्या दोघांसोबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात गेल्याचे समजताच आरोपींनी धारदार शस्त्रांनी विलास यांच्यावर प्राणघात वार करुन गंभीर जखमी केले आणि फरार झाले. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.