Pune Gramin

तळेगावात जमिनीच्या वादातून टोळक्यांनी मायलेकाला मारहाण करत दिली जीवेमारण्याची धमकी

By PCB Author

November 04, 2018

तळेगाव, दि. ४ (पीसीबी) – ‘जमीन नावावर करुन दे नाही तर एकएकाला गाठून तोडील’, अशी मायलेकाला घरात घुसून धमकी देत काही टोळक्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर घराची देखील तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कदमवाडी आंबळे येथे घडली.

याप्रकरणी मारहाण झालेल्या ४० वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निलेश बाळू कदम, रवी बाळू कदम (दोघे.रा. कदमवाडी आंबळे) आणि त्यांचे निगडी येथील ८ ते १० साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी निलेश, रवी आणि त्याचे निगडी येथील ८ ते १० साधीदार पीडित ४० वर्षीय महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेला आणि तिचा मुलगा प्रविण याला जबर मारहाण केली. तसेच घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांची तोडफोड करुन, ‘जमीन नावावर करुन दे नाही तर एकएकाला गाठून तोडील’, अशी धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.