Pune Gramin

तळेगावात चार टन गोमासासह टेम्पोचालकाला अटक

By PCB Author

December 23, 2018

तळेगाव, दि. २३ (पीसीबी) – मुंबईला टेम्पोटून चार टन गोमास घेऊन जाणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२२) रात्री उशीरा एकच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ तळेगाव पोलीसांनी केली.

समीर हुसेन शेख (वय ३२, रा. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवशंकर स्वामी (वय २५, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तक्रारदार शिवशंकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, संगमनेर येथील कसाई मोहल्ला येथून गोमासाने भरलेला टेम्पो (क्र. एमएच/१७/बीवाय/०९२२) हा तळेगाव मार्गे मुंबईच्या दिशेने जाणार आहे. यावर तळेगाव पोलीसांच्या सहकार्याने त्यांनी तळेगाव येथील उर्से टोलनाक्यावर सापळा रचला आणि टेम्पो चालक समीर शेख याला अटक केली. तर त्याचा एक साथीदार फरार झाला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ४ टन गोमास आढळून आले. पोलीसांनी ते टेम्पोसहीत जप्त करुन समीरला अटक केली.  तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.