Pune Gramin

तळेगावमध्ये भरधाव कारच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

By PCB Author

March 11, 2019

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) – भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री पावनेसातच्या सुमारास तळेगाव-दाभाडे येथील भोईआळी येथे घडली.

पांडुरंग रामभाऊ भेगडे (वय ७०, रा. भोईआळी, तळेगाव-दाभाडे) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी विश्वास मधुकर घुले (वय ४७, रा. रविवार पेठ, भोई आळी, तळ्याच्या शेजारी) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारचालक ओंकार राजेंद्र ठुबे (वय १८, रा. भोईआळी, तळेगाव-दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावनेसातच्या सुमारास आरोपी कारचालक ओंकार याने त्याच्या ताब्यातील कार (क्र. एमएच/०१/व्हीए/४६२५) हायगाईने भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या चार दुचाक्यांना धडक दिली. तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेले वृध्द पांडुरंग भेगडे यांना जोरदार धडक दिली. या घटनेत भेगडे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालक ओंकार ठुबे याला अटक केली आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.