तळेगावमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या

0
2663

तळेगाव, दि. २६ (पीसीबी) – पत्नी करत असलेली सततची भांडणे, खोट्या तक्रारी आणि मुलाला भेटू न दिल्या कारणावरुन नैराश्य आलेल्या एका विवाहित तरुणाने तो राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यांच्या घरातील गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारी एकच्या सुमारास तळेगाव येथील पॅरडाईज, पी.बिल्डींग फ्लॅट क्र. ४०४ येथे घडली.

विजय गोविंद जाधव (वय ३२, रा. फ्लॅट क्र. ४०४, पी.बिल्डींग, पॅरडाईज, तळेगाव) असे घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल गोविंद आनंदा जाधव (वय ६४, रा. साईनगर मामुर्डी, त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी देहुरोड) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत विजय याची पत्नी प्रतिभा विजय जाधव (वय २६, रा. दत्तवाडी, म्हसोबा चौकाजवळ, पुणे) हिच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद जाधव यांचा मुलगा विजय याचे प्रतिभा सोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला. मात्र घरघुती भांडणामुळे विजय आणि प्रतिभा यांच्यामध्ये खटके उडी लागले. यामुळे विजय याने विभक्त होण्याचा निर्णय घेऊन दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. मात्र या दरम्यान प्रतिभा सतत भांडणे आणि तक्रारी करुन विजयला त्याच्या मुलाला भेटू देत नव्हती. यामुळे निराश झालेल्या विजय याने तळेगाव येथे राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रतिभावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.