Pune Gramin

तळेगावमध्ये दिवसाढवळ्या बनावट चावीने दरवाजा उघडून दोन लाखांचे सोने चोरट्यांनी केले लंपास

By PCB Author

May 07, 2019

तळेगाव, दि. ७ (पीसीबी) – बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून दोन लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. ६) दुपारी अडीचच्या सुमारास पियुष अपार्टमेंट तळेगाव दाभाडे येथे घडली.

सुरेखा बबन खोल्लम (वय ६१, रा. पियुष अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांचे पियुष अपार्टमेंट येथे रो हाऊस आहे. सोमवारी दुपारी अडीच ते सायंकाळी पावणेसात या कालावधीत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात आरोपीने बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडले. १०४ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरी करून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.