Maharashtra

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खून प्रकरणी सरकारी  वकील उज्ज्वल निकम घेणार प्रतिदिन ५० हजारांचे मानधन

By PCB Author

August 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – प्रसिध्द  सरकारी  वकील उज्ज्वल निकम यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी किती मानधन मिळते, हे आता समोर आले आहे. निकम यांची तळेगाव दाभाडे येथील २०१६ मधील खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली असून या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांना प्रतिदिन ५० हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याशिवाय विचारविनिमय शुल्क, हॉटेल लॉजिंग बोर्डिंग आणि प्रवास खर्चासाठी अतिरिक्त पैसे दिले जाणार आहेत.

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके यांची ऑक्टोबर २०१६ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निकम यांना या खटल्यासाठी किती शुल्क द्यावे हे नुकतेच निश्चित करण्यात आले आहे. ३१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.