तळवडे येथील खूनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून त्या इसमाचा डोक्यात दगड घालून खून

1216

तळवडे, दि. १७ (पीसीबी) – सोमवारी तळवडे गावाच्या हद्दीत असलेल्या शिवारात एका इसमाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलीसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने खून झालेल्या इसमाच्या पत्नीच्या प्रियकरानेच त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.

बाळासाहेब भाऊसाहेब सपाटे (वय ३४, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रामदास कांबळे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी तळवडे येथील शिवारात अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. यावर प्राथमिक तपासात खून झालेल्या व्यक्तीच्या हातावर रंजना असे नाव असल्याची माहिती समोर आली. मृताची ओळख पटावी म्हणून वृत्तपत्रात त्याची माहिती प्रसिध्द करण्यात आली. बातमी पाहतून मृताचा भाऊ मंगेश सोनबा कांबळे यांनी मृताची ओळख पटवून त्याचे नाव रामदास कांबळे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रामदास यांच्या घराजवळील परिसरात, मित्र, नातेवाईक तसेच कामाच्या ठिकाणी विचारपूस केली. त्यानंतर खंडोबामाळ, रुपीनगर आणि तळवडे परिसरातून चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता मयत रामदास याच्या पत्नीचे बाळासाहेब सपाटे सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. पोलीसांनी तातडीने सपाटे याला ताब्यात घेतले असता रविवारी (दि.१४) त्याने रामदास याला जास्त दारु पाजून तळवडे येथील शिवारात नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

ही कामगिरी देहुरोड आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे.