तळवडेतील ज्योतीबानगरमध्ये लाकडाच्या वखारीला आग

0
972

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – तळवडेतील ज्योतीबानगरमध्ये एका लाकडाच्या वखारीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. वखारीत लाकड आणि भुस्सा असल्याने आगीने विक्राळ रुप धारण केले होते. मात्र तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

तळवडे अग्निशमन दलाचे जवान शाहू व्हनमाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१८) सकाळी सहाच्या सुमारास तळवडेतील ज्योतीबानगर येथील एका लाकडाच्या वखारीला आग लागल्याची माहिती तळवडे अग्निशमन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन दलाच्या चार बंबासह २५ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वखारीत लाकड आणि भुस्सा असल्यामुळे आगीने विक्राळ स्वरुप धारण केले होते. यामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांचा तब्बल तीन तास अथक परिश्रम घ्यावे लागले. आगीत वखारीतील लाकडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.