Maharashtra

…तर संघर्ष अटळ आहे!! भाजप नेत्याचा इशारा

By PCB Author

April 12, 2021

मुंबई,दि.१२(पीसीबी) – करोनाच्या फैलावास कारणीभूत ठरणारी गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारनं मागील आठवड्यापासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य सुविधांवर ताण येत आहे. रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. रेमडेसीविरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. यावर उपाय म्हणून रुग्णसंख्या कमी कशी करता येईल यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा त्यावर पर्याय असल्याचं सरकारचं ठाम मत आहे. त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, व्यापारी आणि सर्वसामान्यांची बाजू घेत भाजपनं लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.

भाजप नेते नीतेश राणे यांनीही व्यापाऱ्यांची बाजू घेत सरकारला इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार आहेत. आम्ही सर्व व्यापारी बांधवांबरोबर आहोत. महाराष्ट्र सरकारनं कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे,’ असं नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून..

सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!!
महाराष्ट्र सरकार नी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!

— nitesh rane (@NiteshNRane) April 11, 2021