…तर शरद पवार मोदी सरकारला पाठिंबा देतील – उध्दव ठाकरे

0
758

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणातील स्थिर सरकार हा  एक परवलीचा शब्द आहे. त्यामुळे  उद्या एनडीएला  दोन-पाच जागा कमी पडल्या तर स्वतः शरद पवारांनी स्थिर सरकारच्या नावाखाली मोदी सरकारला पाठिंबा दिला, तरी कुणाला आश्चर्य वाटायला नको,  असे शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी  ‘ सामना’ च्या अग्रलेखात म्हटले आहे.  

शरद पवार हे स्थिर सरकारच्या नेहमी गप्पा मारत असतात. तरी त्यांच्या राजकारणाला कधीच स्थैर्य लाभलेले नाही. पुलोदचे त्यांचे मंत्रिमंडळही अस्थिर होते व त्यानंतर अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना स्थैर्य  मिळालेला  नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

काँग्रेसविरोधात पवारांनी दोन वेळा भूमिका घेतल्या. एकदा इंदिरा गांधी हयात असताना व नंतर सोनिया गांधींच्या विरोधात विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी ‘बंड’ पुकारले, पण शेवटी बंडोबा थंडोबा झाला व काँग्रेस पक्षाशीच हातमिळवणी करून पवार पुन्हा केंद्रात मंत्री झाले, असे अग्रलेखात म्हटले आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची  तीन नावे जाहीर केली. यात चौथे नाव नजरचुकीने राहून गेले ते राहुल गांधी. स्वतः पवार पाचवे आहेत.  अर्थात या पाचही पात्रांना दिल्लीतील रंगमंचावर भूमिका मिळण्याची शक्यता अजिबात नाही, असे या अग्रलेखात नमूद केलेले आहे.