…तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिले नाही ? – तारिक अन्वर  

0
650

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल  खरेदी व्यवहारप्रकरणी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण का दिले नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला  सोडचिठ्ठी दिलेले   खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे. पवारांच्या वक्तव्यावर नाराज होऊन त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याचे  सांगितले जात आहे.

पवारांच्या वक्तव्याचा जो निष्कर्ष   काढला त्यातून दिसून आले आहे की, पंतप्रधानांची बाजू त्यांनी घेतली. त्यांनी पंतप्रधानांना क्लीन चिट दिली. सर्व आरोप पंतप्रधानांवर होत आहेत. आणि पंतप्रधानांवर संशय नाही, असे म्हटले तर या प्रकरणी जो रोष आहे तो निरर्थक असल्याचे वाटते, असे सांगून तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे,  असे वाटत असते, तर पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवे होते. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर २४ तास वाट पाहिली, कारण पवार स्पष्टीकरण देतील, असे वाटले होते. मात्र,  त्यांचे कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय  घेण्यात आला ,  असे तारिक अन्वर यांनी सांगितले.