“…तर या पक्षात फक्त आणि फक्त पाव्हणेच राहतील”

0
1094

– पिंपरी चिंचवडमधील एका भाजपा निष्ठावंताची व्यथा

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – उभे आयुष्य घरदार, कुटुंब न पाहता भाजापमध्ये घालविलेल्या निष्ठावंतांची सद्या त्यांच्याच पक्षात अक्षरशः वाताहात झाली आहे. घरात शिरलेले उंट आता या निष्ठावंतांना त्यांच्याच घरातून बाहेर हाकलण्याच्या मनस्थितीत आहेत. चिंचवडगाव परिसरात गेली ३०-४० वर्षे भाजपाचे कार्य घराघरातून पोहचविणारे, प्रदेश पातळीवर अनेक वर्षे काम केलेले, भाजपाच्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या पासून तमाम बड्या नेत्यांशी संपर्क असलेल्या महेश कुलकर्णी यांच्या बाबतीत हा किस्सा घडला आहे. स्वतः महेश कुलकर्णी यांनी आपली व्यथा त्यांच्याच फेसबूक पेजवर शेअर केली आहे. पक्ष विरोधी काम केले म्हणून आता महेश कुलकर्णी यांना आमदार व पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी नोटीस काढली आहे. “मी आता त्या नोटीसचीच वाट पाहतोय”, असे अत्यंत दुःखद अंतकरणाने व खेदाने कुलकर्णी म्हणत आहेत.

आपल्या पोस्टमध्ये कुलकर्णी म्हणतात, आज मला मोरेश्वर शेडगेचा फोन आला की, काका तुम्हाला पक्षविरोधी कारवाई मुळे नोटीस काढली आहे. मी म्हणालो ठीक आहे , द्या आणुन. कारण हे की पत्रकारांनी त्याच्या वेब पोर्टलवरुन मनपा भाजपा सत्तेतील कारभाराची छि थु केली. खरे तर, ती बातमी अत्यंत वेदना दायक आहे. पक्षाबद्दल असे लिहणे त्यांचे काम असल्याने,, ते मला आलेले होते. मी ते एका ग्रुपवर टाकले. म्हणुन मला नोटीस काढली म्हणे. काही हरकत नाही आमदार महेश दादा व आमदार लक्ष्मणराव यांचे धाकाने म्हणा किंवा धास्तीने म्हणा मला नोटीस मोरेश्वर देणार आहे. आता मी नोटीसची वाट पाहतो. ती आल्या नंतर मी सांगेलच की. पंरतु हे मला काही नविन नाही. चिंचवडला तर नाहीच नाही.

महेश कुलकर्णी यांनी तिरकसपणे भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या दिशेने एक मोठा सणसणीत शालजोडीतला टोला लगावला आहे. ते म्हणतात, राजकारणात मी एवढी वर्ष एकाच पक्षात राहुन काम करतोय, हे ही नसे थोडके.
नोटीस काढणाऱ्यांना महेश कुलकर्णी यांनी एक गर्भीत इशाराही दिला आहे. ते म्हणतात, मला असे वाटते की, आधीच ओबीसी चा भडका, त्यात माझ्या सारख्या ब्राम्हण कार्यकर्त्यावर तडका हा आहे. अरे… तुम्ही अशा गोष्टीतुन निमित्त साधुन निवडणुक किंवा पदावाचुन मला वंचित कराल, पण एक लक्षात घ्या मोसम जवळ आहे आणि चिंचवड मध्ये समाजाची मते निश्चित आहेत. एकवेळ कार्यकर्ते काम करायला मिळतील, बुथवर बसायला मिळतील, पण मतांचे काय. समाजातील पदांवर संधी मिळण्यासाठी अशा प्रकारचे नामी उपाय करुन यशस्वी व्हाल पण, संघटनेसाठी जिवापाड काम करत आयुष्य घालवलेल्यांच्या बाबतीत असेच नोटीसीचे काम कराल तर या पक्षात फक्त आणि फक्त पाव्हणेच राहतील. आणि मग उगाच संघटन गढे चलो, सुंपथ परदेश बढे चलो, या ओळीच शिल्लक राहतील. मला हे काही नविन नाही असे प्रयोग अनेक वेळा झाले.पण रडत बसलो नाही व कुठल्या पक्षात गेलो नाही.
बघु या मोरेश्वरची वाट उद्या येतो म्हणालाय. नोटीस मिळाल्यानंतर पुन्हा काय आहे हे नोटीसीत सांगेलच ना मी.
तेव्हा आता जय श्रीराम…