‘मग आमच्या सर्वांच्या किडनी विकून महामार्ग बनवा’; मोदींची बाजू घेणाऱ्या बॉलिवूड कलाकाराला नेटकऱ्यांनी सुनावलं

0
310

मुंबई, दि.१२ (पीसीबी) : वाढत्या महागाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. अन्नधान्य आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. किमतींवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि समर्थकांना यासाठी सरकार जबाबदार नसल्याची विधाने केल्याने लोकांनी यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. अलीकडेच भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे पैसे मोफत लसीसाठी वापरले जात आहेत असे म्हटले होते. तर काही केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेसने दिलेल्या ऑईल बॉन्डमुळे भाव वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता गजेंद्र चौहान यांनीही असेच काहीसे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शनिवारी बॉलिवूड अभिनेता गजेंद्र चौहान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी ‘नरेंद्र मोदी महाग झालेल्या पेट्रोलचे पैसे आपल्या घरात ठेवत नाहीत तर देशाच्या विकासात गुंतवणूक करतात’, असे म्हटले आहे.

“मोदी सरकार असे आणखी १९ महामार्ग बांधणार आहे ज्यांच्यावर लष्कराची विमाने उतरतील. मोदी तुमच्या महागड्या पेट्रोलचे पैसे घरात ठेवत नाहीत, ते देशाच्या विकासात गुंतवणूक करत आहेत,” असे गजेंद्र चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मात्र गजेंद्र चौहान यांनी हे ट्विट करताच नेटकऱ्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या सर्व राष्ट्रीय/राज्य महामार्ग खाजगी कंपन्यांकडून स्वखर्चाने बांधले जात आहेत आणि व्याजासह खर्च जनतेकडून टोल टॅक्स म्हणून वसूल केला जात आहे. कोणत्याही सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ‘तर मग मोदी टोलही भरतील का? असा सवाल एका युजरने केला आहे. ‘सर, मग तुम्ही पेट्रोलची किंमत का वाढवत आहात? आमच्या सर्वांच्या किडनी विकून महामार्ग बनवा, असा खोचक सल्ला एका युजरने दिला आहे.

‘डिझेल, पेट्रोल, मोहरीच्या तेलासाठी ५०० रुपये लिटर घ्या. जेव्हा एखादी व्यक्ती उपाशी मरते तेव्हा देशाचे काय होईल?,’सार्वजनिक पैसा का? खासदार आणि मंत्र्यांचे पैसे का नाही? ‘ असे सवाल गजेंद्र चौहान यांना करण्यात आले आहेत.