…तर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जळून खाक होईल; मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांना उध्दव ठाकरेंचा इशारा

0
411

अहमदनगर, दि. २३ (पीसीबी) –  रोज वर्तमान पत्रात मुख्यमंत्री कोण होणार हे छापून येते आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचे नाही. मात्र, मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडवाव्यात. अन्यथा ही आग वाढत गेली, तर सत्तेची आसन सुद्धा जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज (रविवार) उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? या बातम्या येत आहे. पण माझे त्याकडे लक्ष नाही. ज्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची आग आहे. त्यांना शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री आणि माझे चांगले संबंध आहेत.  लपवण्यासारखे काहीच नाही. पण याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील सरकार विरुद्ध मी आता काही बोलत नाही. आमचे आता जुळले आहे. युती करताना शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे,  तर कर्जमुक्ती ही प्रमुख अट ठेवली आहे, असे सांगून आपले सरकार आणत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात का?, हे पाहण्यासाठी आलो  आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.