…तर मी स्मिथच्या तोंडावर बॉल फेकून मारला असता – शोएब अख्तर

1046

इस्लामाबाद, दि. ७ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ क्रिकेट जगतातील सध्याच्या क्रिकेटपटूंपैकी महत्त्वाचा खेळाडू आहे. फार कमी कालावधीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तर सध्या तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मात्र अशा प्रतिभावान खेळाडूबाबत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एक विधान केले आहे. माझ्या वेळी जर स्मिथ असता तर मी किमान ३ ते ४ वेळा त्याच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता, असे शोएब अख्तरने एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

फलंदाजी पाहून मी अवाक झालो. त्याची फलंदाजी तांत्रिकदृष्ट्या फारशी चांगली नाही, पण त्याच्या फलंदाजीत धाडस आहे. तो खेळताना धाडसी वृत्तीने गोलंदाजावर अधिराज्य गाजवतो. त्यामुळेच तो मैदानात अत्यंत परिणामकारक ठरतो. तो गोलंदाजावर चाल करून जातो आणि त्या गोलंदाजाला चांगलाच चोप देतो. तो सगळे कसे करतो ते मला माहिती नाही. पण तो जर माझ्या काळात फलंदाजीला उतरला असता, तर मी नक्कीच त्याला रोखण्यासाठी त्याच्या तोंडावर गोलंदाजी करताना ३ ते ४ वेळा चेंडू फेकून मारला असता.

स्टीव्ह स्मिथ हा खूप धाडसी आणि जिद्दी फलंदाज आहे. त्यामुळे मी त्याला रोखण्यासाठी त्याला जायबंदी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. त्याला दुखापतग्रस्त करण्याच्या उद्देशाने मी त्याच्या तोंडावर चेंडू फेकून मारला असता. पण तो सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळतो आहे, त्यावरून त्याला जायबंदी करणेही कठीण किंवा अशक्य आहे असे वाटते आहे. तो खूप चांगली फलंदाजी करतो आहे. त्याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!, असेही शोएब अख्तर म्हणाला.