…तर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव निश्चित    

0
1879

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – देशातील पाच राज्यातील निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून रहिले आहे. दरम्यान, मतदान पूर्व केलेल्या सर्वेक्षणात आजच्या तारखेला विधानसभा निवडणुका घेतल्या, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला  पराभव स्वीकारावा लागेल. तर छत्तीसगडमध्येही भाजपवर पराभवाचे सावट असेल, असे या सर्व्हेत म्हटले आहे. 

या सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील २३० जागांपैकी ११९ जागांवर  काँग्रेसचा विजय होऊ शकतो. तर  राज्यातील सत्ता चौथ्यांदा ताब्यात ठेवण्यास प्रयत्नशील असणाऱ्या भाजपला १०५ जागा मिळतील. तर इतरांना सहा जागा मिळतील. मध्य प्रदेशात आजच्या तारखेला मतदान झाले, तर काँग्रेसला जास्त फायदा  होईल,  असे म्हटले आहे. काँग्रेसला ४३, भाजपला ४२ आणि इतर पक्षांना १५ टक्के मते मिळतील.

राजस्थानात विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत. येथे काँग्रेसला सर्वात जास्त १४४ जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ ५५ जागांवर समाधान मानावे लागण्याची  शक्यता आहे. काँग्रेसला ४९, भाजपला ३७ आणि इतरांना १४ टक्के मतदान मिळेल.

छत्तीसगड येथे एकूण ९० जागा असून भाजप गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर आहे. मात्र, येथे भाजपला ४३, काँग्रेस ४२ आणि इतर पक्षांना ५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे भाजप आणि काँग्रेसला अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन सरकार स्थापन करावे लागण्याची शक्यता आहे.  भाजपला ४०.१, काँग्रेसला ४० आणि इतरांना १९.९ मतदान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.