Maharashtra

…तर मग नमो अ‍ॅपवरही बंदी घाला – पृथ्वीराज चव्हाण

By PCB Author

June 30, 2020

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – नमो अ‍ॅपवरही बंदी घाला अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. १३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.#BanNaMoApp हा हॅशटॅगही त्यांनी ट्रेंड केला आहे.

पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन विरोधात प्रचंड रोष आहे. अशात सोमवारी म्हणजेच २९ जून रोजी रात्री उशिरा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला. ५९ चिनी अॅप्सवर भारताने बंदी घातल्याचं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. टिक-टॉक, यूसी ब्राऊझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. यानंतर काहींनी या निर्णयाच विरोध दर्शवला आहे तर काहींनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अशाच प्रकारे भारतीयांचा डेटा परदेशात पाठवणाऱ्या नमो अॅपवरही बंदी घाला अशी मागणी ट्विट करत केली आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत चव्हाण? “१३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे”

नेमका निर्णय काय झाला? सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.