Desh

…तर भारतावर आज मराठ्यांचे राज्य आणि छत्रपतींचे सुशासन असते – शशी थरुर

By PCB Author

July 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – सुप्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे माजी नेते शशी थरुर यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. MBIFL १९ या फेस्टिव्हलमध्ये व्याख्यान देण्यासाठी शशी थरुर आलेले असताना त्यांना एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर काय घडले असते? त्यावर शशी थरुर यांनी हे उत्तर दिले आहे की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचे राज्य असते असे उत्तर दिले आहे.

आपल्या भाषणात त्यांनी तंजावूरचे उदाहरणही दिले आहे. संभाजी महाराजांना सांभार खावसे वाटत होते म्हणून ते खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आले. त्यानंतर हा पदार्थ दक्षिणेत आला त्यामध्ये स्थानिक मसाले, चिंच यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सांबार ही मराठ्यांनी दिलेली देणगी आहे. संभाजी महाराजांना ते आवडत असे त्यामुळे त्याचे नाव सांभार असे पडले होते असेही शशी थरुर यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही महाराष्ट्रात त्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यानंतरही पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपल्याला इतिहासावरुन ठाऊक आहेच. त्याचमुळे जर इंग्रज भारतात आले नसते तर मराठ्यांनीच देशावर राज्य केले असते असे शशी थरुर यांनी म्हटले आहे.

आपल्या साधारण तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये थरुर यांनी देशात आपल्या वेगळे असण्याचा इंग्रजांनी कसा फायदा घेतला ते देखील सांगितले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरलही होतो आहे.