…तर पेट्रोल-डिझेलची ३५ ते ४० रुपयांनी विक्री करु शकतो – रामदेवबाबा

0
1734

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) –  केंद्र सरकारने मला परवानगी दिली, तर मी पेट्रोल-डिझलेची ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले  आहे. सरकारने मला परवानगी देऊन  करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली, तर मी पेट्रोल-डिझेल स्वस्त  दराने विकू शकतो, असे रामदेव म्हणाले. 

एका  वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये  रामदेवबाबा बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकारने महागाई कमी केली नाही, तर सरकारला चांगलाच फटका बसेल. २०१९ आधी इंधनाचे दर कमी करा, असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे. ते पुढे म्हणाले की, जर सरकारने मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी दिली आणि करामध्ये थोडीफार सवलत दिली, तर मी संपूर्ण देशात ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो. सरकारने इंधनाचा  जीएसटीमध्ये समावेश करावा, असेही ते म्हणाले.

रामदेवबाबा यांनी महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल,  अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.