Banner News

… तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल

By PCB Author

October 11, 2020

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : कोरोना पाहुणा हातपाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की,  मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. सार्वजनिक ठिकाणी, शौचालयातदेखील मास्क काढायचा नाही. मास्क घातलाच पाहिजे, योग्य पद्धतीनेच. तो गॉगल नाही, तोंडावर घाला. नाक, तोंड झाकुनच ठेवायला हवे. सर्वांनी! मास्क तोंडावर असला तरी डोळे उघडे ठेवा, समोरच्याचा मास्क नीट नसेल तर सांगा कारण तो कुठुनही शरीरात प्रवेश करु शकतो, असं ठाकरे यांनी सांगितलं.

माझे कुटुंब, माझी जबाबदारीमोहिम यशस्वी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वीपणे राबवली जात आहे.  विशेष करून आरोग्य यंत्रणा, आंगणवाड्या, सर्व कर्मचारी, महसुल विभागाचे आभार मानतो. सकाळपासुन संध्याकाळपर्यंत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम करतात, त्यांच्यासाठी आभार मानायला शब्द नाहीत. या सरकारी  कर्मचाऱ्यांनी अनेकांचे जीव वाचवलेत. स्वत: आजारी पडले, लढुन बरे होऊन परत लढायला लागले, असं ठाकरे म्हणाले. सर्व यंत्रणांना मार्च पासून किती ताणाखाली काम कराव लागतंय विचार करा. त्यांना धन्यवाद. नागरिकांकडून अजून सहकार्य हवे आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र कदाचित जगात एकमेव राज्य आहे जेथे जनतेने साथ देऊन ही चळवळ उभारली. स्वराज्य चळवळीने आपण इंग्रजांना घालवले, मग कोरोनाला घालवू शकणार नाही? असा सवाल त्यांनी केला.  दुर्लक्ष करून तुम्ही स्वत:चा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालत आहोत. लक्षणे दिसल्यास टेस्ट करून घ्या. पॉझिटिव्ह आल्यास घाबरू नका, 100 वर्षांचे अगदी अन्य व्याधी असलेले देखील वेळेत आल्यास बरे झालेले उदाहरण आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, राज्यात व्हेंटिलेटरवर साधारणत: दोन – सव्वादोन हजार रुग्ण आहेत. काहीजण ऑक्सिजनवर आहेत. दुर्दैवाने 40000 मृत्यू झाले. काहींना सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत. काही बरे होत आहेत तर काहींना संघर्ष करावा लागत आहे. विशेषत: ज्यांन कोमॉर्बिलिटी आहे जसे मधुमेह, रक्तदाब, स्थुलता अशा रुग्णांना धोका जास्त आहे.   ते म्हणाले की, आपलं एक नात आहे, त्यावर सांगतो एक क्षणही बेसावध राहु नका, गाफील राहु नका. कोरोनाचे बळी ठरु नका. सुजाणपणे, सजगपणे आपण आयुष्य जगणार आहोत, कोरोनाला वगळून!