तर पुढील २०-३० वर्षे भाजपा सत्तेत कायम राहिल

0
374

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – भारतातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील विरोधी पक्षांना गंभीर इशारा दिला आहे. “ज्यांना असं वाटतं की भाजपाचा जशी सत्तेवर आली, तसाच तिचा पायउतार होईल, त्यांचं आकलन योग्य नाही, उदय झाला,” असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षांनी योग्य कृती केली नाही, तर पुढील अनेक दशकं भाजपाशी देशपातळीवर सामना करू शकेल असा पर्याय तयार होणार नाही, असा इशारा किशोर यांनी दिला. ते मंगळवारी (१० मे) इंडियन एक्स्प्रेसच्या ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात बोलत होते. एक्स्प्रेस समुहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका आणि इंडियन एक्स्प्रेसच्या संपादक वंदिता मिश्रा यांनी ही मुलाखत घेतली.

प्रशांत किशोर म्हणाले, “ज्यांना असं वाटतं की भाजपाचा आलेख जसा वर गेला तसाच तो आपोआप खाली येईल, तर ते लगेच होणार नाही. दीर्घकाळाचा विचार केला तर तसं होऊ शकतं. मात्र, त्याचे दोन भाग आहेत. भाजपा पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणात एक मजबूत पक्ष म्हणून टिकून राहील. एकदा का तुम्हाला भारताच्या स्तरावर ३० टक्के मतं मिळाली, त्यानंतर तुम्हाला कोणीही हटवू शकत नाही. ही स्थिती अशी नाही की ती आपोआप नाहीशी होईल.”
“याचा अर्थ भाजपा प्रत्येक निवडणूक जिंकेल असाही नाही. भारताच्या राजकारणात पहिले ४०-५० वर्षांचं राजकारण काँग्रेसभोवती होतं. तेव्हा तुम्ही काँग्रेससोबत असो किंवा तुम्ही काँग्रेसच्या विरोधात याने फरक पडला नाही. त्यानंतरच्या २०-३० वर्षात भारतीय राजकारण भाजपाच्या भोवती केंद्रीत झालं, मग तुम्ही भाजपासोबत असो किंवा भाजपाविरोधात. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की भाजपाचा आलेख आपोआप खाली येईल त्यांचं हे आकलन योग्य नाही,” असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

“…तेव्हा मजबूत पक्षाचा सत्तेत असण्याचा कालावधी मोठा असू शकतो”
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “मी असं म्हणतो आहे कारण तुम्ही भारतीय राजकारणाचे पहिले ५०-६० वर्षे पाहा. १९५०-१९९० या काळात १९७७ चा अपवाद वगळला तर भारतात असा एकही पक्ष नव्हता जो काँग्रेसला अखिल भारतीय पातळीवर आव्हान देऊ शकेल. त्यामुळे तशाच परिस्थितीला आता पुढील बरीच वर्षे सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा विरोधी पक्ष विभागलेला असतो किंवा एकत्र येण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा मजबूत पक्षाचा सत्तेत असण्याचा कालावधी मोठा असू शकतो.”

“याचा अर्थ ते २ किंवा ५ वर्षात होईल असं नाही, तर त्यासाठी २०-३० वर्षे देखील लागू शकतात. भाजपाविरोधात विरोधी पक्ष असावा आणि विरोधी पक्षाचा उदय होईल असं वाटल्याने बदल होणार नाही. ते स्वप्नाळू विचार आहेत. योग्य कृतीने कदाचित २ वर्षात मजबूत विरोधी पक्ष तयार होऊ शकतो, पण तुम्ही योग्य गोष्टी केल्या नाहीत तर अनेक वर्षे देशपातळीवर भाजपाशी सामना करू शकेल असा पर्याय तयार होणार नाही,” असंही प्रशांत किशोर यांनी नमूद केलं.