“..तर देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी राजीनामा दिला नसता”

0
837
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई, दि.२८ (पीसीबी)- विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर चाललेल्या सत्ता संर्घषानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोनजण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठले यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तास एवढा कमी कालावधी दिला नसता तर, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता, असे त्यांनी म्हटले आहे.

”भाजपा देखील बहुमत दाखवून सत्ता स्थापन करू शकली असती. सर्वोच्च न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली नसती, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला नसता. चोवीस तासांच्या कमी कालावधीत बहुमत सिद्ध करणे कठीण होते.” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपा व शिवसेना या दोन मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यावरून एकमत न झाल्याने युती तुटली. शिवसेनेने एनडीएला सोडचिठ्ठी देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाकडे पुरसे संख्याबळ न उरल्याने सरकार स्थापनेस असमर्थ असल्याचे भाजपाकडून राज्यपालांना पत्र देण्यात आले. यानंतर संख्याबळानुसार सर्वात मोठा दुसरा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेचे राज्यपालांना निमंत्रण देण्यात आले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून त्यावेळी शिवसेनेला समर्थनाचे पत्र देण्यास विलंब झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू असताना, अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला समर्थन दिल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजित पवारांबरोबर गेलेले सर्व आमदार हळूहळू राष्ट्रवादीत परतले आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भाजपा सरकारविरोधात सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत, २४ तासांत भाजपाला बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली. यानंतर अजित पवार यांनी झाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. अखेर पुरेसे संख्याबळ नसल्याने नाईलाज झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागला.