…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे

0
708

लातूर, दि. २३ (पीसीबी) –  राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात विलंब होत आहे. यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपग्रहाद्वारे मॅपिंग करून दुष्काळ जाहीर करणार असाल,  तर तुम्ही खुर्चीवर  कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेच्या वतीने आज (मंगळवार) गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील फडणवीस सरकार, आणि केंदातील  मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. मोदी हे खोटे बोलून सत्तेवर आले आहेत. आता ते निवडणुका जवळ आल्या की पुन्हा तुमच्यासमोर येतील. त्यावेळी ‘कहा है अच्छे दिन’ असे त्यांना विचारा, असे ते म्हणाले.

मोदी सरकार भंपक आहे, अशी टीका करून आपण २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहोत. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा लावून धरणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. मी सरकारच्या विरोधात नाही, तर जनतेच्या बाजूने बोलत आहे. जनतेचे प्रश्न मांडतच राहणार आहे.  जर काही चूकीचे होत असेल, तर सरकारवर  आसूड ओढणारच असे ते म्हणाले.  जनतेच्या पाठिंब्यावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.