…तर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडू; विनायक मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

0
1273

बीड, दि. १६ (पीसीबी) – भाजपमध्ये चुकीची वागणूक मिळत आहे, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची  २५ डिसेंबर रोजी  भेट घेणार आहे. तो पर्यंत योग्य तो निर्णय न झाल्यास जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी आज (रविवार) येथे दिला.

मेटे म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही माहायुतीमध्ये आलो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये योग्य वागणूक मिळत नाही.  त्यासाठी २५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत भेट होणार आहे. त्यावेळी यावर तोडगा निघाला नाही, तर आम्ही जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडू.

 

मुख्यमंत्र्यांच्या माध्यस्तीनंतर आम्ही भाजपसोबत एकत्र लढलो. सत्तादेखील काबीज केली. परंतु त्यानंतर आम्हाला केवळ एक उपाध्यक्षपद देऊन आमचा व संघटनेचा विश्वासघात झाला. तसेच निवडून आल्यानंतर आम्ही आणलेल्या कामात खोडा घातला जात आहे. आमची माणसे भाजपने फोडली, असा आरोप मेटे यांनी केला. दरम्यान, गेल्या चार वर्षांत मेटेंना भाजपने मंत्रीपदासाठी प्रतीक्षेत ठेवले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत.