‘…तर जमीन गाडून टाकेन, कोणाला तपासही लागणार नाही’; असा इशारा दिला ‘या’ मुख्यमंत्री महोदयांनी

0
230

भोपाळ, दि.२६ (पीसीबी) – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका कार्यक्रमादरम्यान खूपच आक्रमक पद्धतीने भाषण दिलं. “मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत गाडून टाकेन, अन् कोणाला पत्ताही लागणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी काही लोकांना गंभीर इशारा दिला.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले, “मी सध्या खतरनाक मूडमध्ये आहे. जे लोक चुकीचं काम करतात त्यांना मी सोडणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मध्य प्रदेश सोडावं अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन आणि कोणाला पत्ताही लागणार नाही.”

चौहान यांचा या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान ते आक्रमक पद्धतीने बोलत होते. एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला असून यात त्यांनी माफिया लोकांना थेट धमकीच दिली आहे.

भोपाळमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलतानाही मुख्यमंत्री चौहान यांनी अशाच प्रकारची भाषा वापरली होती. ते म्हणाले होते, “सुशासनात मध्य प्रदेशमध्ये गुंड, दादागिरी करणाऱ्या लोकांना सहन केलं जाणार नाही. सर्व गुंडांना तुडवून त्यांचे हात-पाय-कंबर मोडून उद्ध्वस्त करण्यात येईल. जनतेसाठी फुलाप्रमाणे कोमल तर दुष्टांसाठी शस्त्रापेक्षाही कठोर असं आमचं सरकार आहे.”

मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या चौथ्या कार्यकाळात चौहान यांची कार्यपद्धती बरीच बदलली आहे. राज्यातील माफियांविरोधात कडक पावलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात ते वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत.