Maharashtra

…तर कुराण आणि बायबलचेही वाटप करु – विनोद तावडे

By PCB Author

July 12, 2018

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचे वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार भगवदगीतेचे वाटप करत नाही. भिवंडीची भक्ती वेदांत संस्था आमच्याकडे भगवदगीतेचे वाटप करावे, अशी मागणी घेऊन आली होती. मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. भगवदगीतेचे वाटप कोणत्या महाविद्यालयांमध्ये करावा, याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. कुराण आणि बायबलचे वाटप करावे, अशी मागणी झाली तर तेही करु,” असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच भगवदगीतेच्या १८ खंडाचे वाटपावर विरोधक आक्रमक झाले आहेत. “भगवदगीता वाईट आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावे श्रीकृष्ण खोटे बोलत होते असे त्यांचे मत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे,” असे आव्हानही विनोद तावडे यांनी दिले आहे.