…तर कुणी मायचा लाल निवडून येणार नाही; अजित पवारांचे नारायण राणेला प्रत्युत्तर

0
473

मुंबई,दि.१३ ( पीसीबी)- राज्यात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाली. असे असले तरी सत्तास्थापनेसाठी बहुमताच्या आकड्याची जुळवाजुवळ करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बोलणी सुरू असून, आपण भाजपाची सत्तास्थापन करण्यासाठी वाटेल ते करू. अनेक आमदार संपर्कात आहेत, असं भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले. त्याला अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले आहे.

. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले होते, “भाजपाकडूनही सत्तास्थापनेचे प्रयत्न केले जाणार आहेत. पक्षानं माझ्यावरही जबाबदारी दिली आहे आणि मी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, त्यांची नावं जाहीर केली तर भाजपात येणार नाही,” असेही राणे म्हणाले होते.

नारायण राणे यांचा अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतून समाचार घेतला आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले, “नारायण राणे यांचे बोलणे गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आजच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही. जर कुणी असा प्रयत्न केला, तर सर्वपक्षीय मिळून त्यांना पराभूत करू. राज्यातील तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. असे असताना कुणी मायचा लाल निवडून येणार नाही,” असा दावा करत अजित पवार यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले.